माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता; पोलिसांचा गौप्यस्फोट

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा नक्षली कारवायांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत.

Updated: Aug 31, 2018, 04:16 PM IST
माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता; पोलिसांचा गौप्यस्फोट title=

मुंबई: नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांत राज्यभरात सुरु असलेल्या अटकसत्राच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले. 

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून वरावर राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या या कारवाईवर टीकेची झोड उठली होती. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी या कारवाईचे समर्थन केले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा नक्षली कारवायांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. या व्यक्तींच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली. यावरुन हे लोक नक्षलवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे आढळून आल्याचे परमवीर सिंह यांनी सांगितले. 

रोना विल्सन यांनी 4 लाख राऊंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र लिहिले होते. यामध्ये राजीव गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या घातपाताचा कट आखण्यात आला होता.अन्य देशांमधील संघटनांशी हे माओवादी संपर्कात होते आणि मोठा घातपात घडवण्याचा कट होता असे पोलिसांनी सांगितले. 

तसेच रोना विल्सननी मिलिंद तेलतुंबडे यांना लिहलेले पत्रही पोलिसांनी वाचून दाखवले. यामध्ये भीमा कोरेगाव दंगलीमध्ये महत्त्वाची ठरलेल्या एल्गार परिषद यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. भाजपाच्या व आरएसएस प्रभावखालील राज्यात आंदोलन आणखी उग्र करण्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपाच्या ब्राह्मणी कार्याविरोधात दलितांचे आंदोलन उभे करण्याचाही उल्लेख या पत्रामध्ये आहे. त्यामुळे या पाच जणांची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे परमवीर सिंह यांनी सांगितले.