इमारतीच्या ढिगाऱ्याखालून त्यानं मोबाईलवरून मित्रांशी संपर्क साधला, पण...

भेंडीबाजार येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जाफर हुसेन सय्यद नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने तब्बल १० तास मृत्युशी झुंज दिली. जाफरनेच मोबाईलवरुन मदत मागितली. मात्र तिथं कोणीच पोहचू न शकल्याने शेवटी गुदमरून जाफर सय्यदचा मृत्यू झाला.

Updated: Sep 1, 2017, 07:15 PM IST
इमारतीच्या ढिगाऱ्याखालून त्यानं मोबाईलवरून मित्रांशी संपर्क साधला, पण...  title=

अजित मांढरे, झी मीडीया, मुंबई : भेंडीबाजार येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जाफर हुसेन सय्यद नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने तब्बल १० तास मृत्युशी झुंज दिली. जाफरनेच मोबाईलवरुन मदत मागितली. मात्र तिथं कोणीच पोहचू न शकल्याने शेवटी गुदमरून जाफर सय्यदचा मृत्यू झाला.

डायकीन कंपणीत मॅनेजर पदावर काम करत असलेल्या जाफरला ईद साजरी करण्यासाठी खरेदी करायची होती. म्हणून त्यानं सुट्टीही घेतली होती... दुपारी खरेदी करण्यासाठी बाहेर जायचं असल्याने रोज सकाळी लवकर उठून कामाला जाणारा जाफर ३० ऑगस्टच्या दिवशी आरामात उठायचं म्हणून झोपून राहिला... अचानक सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांनी जाफर राहत असलेली हुसैनी इमारत कोसळली आणि नेमकं काही कळायच्या आधीच जाफर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला.

सय्यदचा लढा अयशस्वी...

सुदैवाने जाफर ज्या ठिकाणी अडकला होता तिथे थोडी रिकामी जागा होती... आणि त्याच्या हातात सुदैवानं मोबाईलदेखील होता. त्यामुळेच तो मित्रांशी संपर्क साधू शकला... आणि आपण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहितीही दिली, अशी माहिती इथला आणखी एक रहिवासी आणि दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यानं दिलीय.  

इमारतीचा काही भाग कोसळलाय हे कळताच जाफरने आपल्या दोन मुलांना बाहेर धाव घेण्यास सांगितले पण ते दोघे बाहेर पडण्याआधीच ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला... पण जाफर मात्र तब्बल १० तास ढिगा-याखालून फोनवरुन संपर्कात होता. पण शेवटी रात्री ७ च्या सुमारास जाफरनं फोन उचलनं बंद केलं आणि तासाभरानंतर त्याला ढिगा-या खालून बाहेर काढण्यात आला...पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्याचा मृत्यू झाला होता. इमारतीत नेमका कोणत्या भागात जाफर होता हे कळू न शकल्याने जाफरपर्यंत मदत पोहचू शकली नाही आणि जाफरचा गुदमरून मृत्यू झाला. दहा तास मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्यानं जगण्याचा संघर्ष केला मात्र अखेर मृत्यूच जिंकला...