रेल्वेत फायरिंग करणाऱ्या RPF जवानाचा पहिला व्हिडीओ, म्हणाला - हे लोक पाकिस्तानातून...

Jaipur Mumbai Train Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला होता.

आकाश नेटके | Updated: Jul 31, 2023, 01:30 PM IST
रेल्वेत फायरिंग करणाऱ्या RPF जवानाचा पहिला व्हिडीओ, म्हणाला - हे लोक पाकिस्तानातून... title=

Jaipur Mumbai Train Firing : सोमवारी सकाळी जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Train) गोळीबाराची घटना घडली आहे. जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरपीएफ जवान चेतन कुमार याने गोळीबार करत चार जणांची हत्या केली आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चेतन कुमारने (Chetan Kumar) साखळी खेचून रेल्वे गाडी थांबवली आणि उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांनी (Railway Police) त्याला अटक केली आहे. मात्र आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

आरोपी चेतन कुमार या व्हिडीओमध्ये हत्या झालेल्या व्यक्तीच्या जवळ उभा असल्याचे दिसत आहे. ट्रेनच्या बोगीमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांना धमकावताना चेतन कुमारने मृत लोकांबद्दल भाष्य केले. "हे लोक पाकिस्तानातून ऑपरेट होत होते. मीडिया आता हेच दाखवणार आहे. यांच्या म्होरक्यांना सुद्धा आता सगळं कळलंय," असे चेतन कुमार म्हणताना दिसत आहे.

जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. त्याचवेळी पालघर स्थानकादरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना आणि इतर तीन प्रवाशांवर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर बोरिवली स्थानकापूर्वीच चेतन कुमार याने गाडीतून उडी मारुन पळ काढला. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.

वापी ते मीरा रोड स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला मीरा रोड येथून अटक केली. त्यानंतर आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही आरपीएफचे जवान ड्युटीवर होते आणि ते मुंबईत येत होते. आरोपी जवानाने आपल्या सर्व्हिस गनमधून गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितलं. आरोपीने 12 गोळ्या रेल्वेच्या बोगीमध्ये विविध ठिकाणी चालवल्या.

या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक आरपीएफ एएसआय टिकाराम मीना आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. मृत्यू झालेले तिन्ही प्रवासी बोरिवली येथे येत होते, अशी माहिती मिळाली आहे. पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. दरम्यान, आरोपी चेतनचा असे करण्यामागचा हेतू काय होता आणि त्याने गोळीबार का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली होती.