मुंबई : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या JEE-NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेने सांगितंल आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दिवशी स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी ऍडमिट कार्ड दाखवावं लागणार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. स्टेशनवरचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांना प्रवासाला परवानगी देण्यात यावी, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या स्टेशनवर जास्तीचे तिकीट काऊंटर उघडण्यात येणार आहेत. इतर कोणीही प्रवासासाठी स्टेशनवर गर्दी करू नये, असं आवाहन रेल्वेने केलं आहे. तसंच प्रवास करताना वैद्यकीय आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गरजेची सगळी माहिती रेल्वेकडून देण्यात येईल, असंही रेल्वेने सांगितलं आहे.