मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर प्रताप नगर स्मशानभूमी परिसरास शेकडो आधार कार्ड आणि बॅंकांची पत्र कचऱ्याच्या ढीगाऱ्यात आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोस्टाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप जनता जागृती मंचने केला आहे. या ढीगाऱ्यातील सर्व महत्वाची कागदपत्र जोगेश्वरीतील रहीवाशांची आहेत. एका महिन्यापासून त्यांना ही कागदपत्र पोस्टाकडून मिळणं अपेक्षित होतं.
प्रताप नगर स्मशानभूमी जवळच्या कचरा वेचकाने एका महिन्यापुर्वी गोळा केलेला ओला कचरा सुकवण्यासाठी टाकला होता. या कचऱ्यावर स्थानिकांची नजर गेली आणि त्यांना धक्काच बसला. साधाराण १५० ते २०० आधार कार्ड आणि बॅंकाचे पत्र या कचऱ्यात सापडली. जनता जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार देणार असल्याने नितीन कुबल यांनी सांगितले.
नागरिकांनी याबद्दल अधिक चौकशी केली असता या प्रकारामुळे पोस्टातून एका पोस्टमनला काढून टाकल्याची माहिती त्यांना मिळाली. केवळ एकाला जबाबदार धरुन चालणार नाही. तर पोलिसांनी पोस्ट मास्टरला किंवा संबधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी जनता जागृती मंचाने केलीय.
जनता जागृती मंचच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह करत याबद्दल माहिती देण्यात आली.