आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण: नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गावर तब्बल चार तासाचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. ऐन सकाळी कामावर जाण्याच्यावेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे फलाटावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर चाकरमण्यांचे मेगा हाल झाले. मेगा ब्लॉक प्री प्लॅन असतानाही रेल्वे प्रशासनाला नियोजन करता आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. दुपारी दोन नंतर लोकलसेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र, दरम्यानच्या काळात वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर टाकण्यात आले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे कल्याणहून मुंबईकडे जाणारी व डोंबिवलीहून कल्याणकडे जाणारी लोकलसेवा बंद होती. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली रेल्वे फलाटावर प्रवाशांची खूपच गर्दी होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने लोकल सोडण्यात येत होत्या. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीने गच्च भरले होते. डोंबिवलीकडे येणाऱ्या लोकल या कोपर, दिवा येथून प्रवाशांनी भरून येत असल्याने डोंबिवलीकर प्रवाशाला गाडीत शिरणेही मुश्कील झाले होते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास रेल्वे फलाटावरच ताटकळत उभे राहावे लागले. वाढत्या गर्दीमुळे व कामावर जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांच्याकडून प्रवाशांना शांत राहण्याच्या सुचना मेगा फोनद्वारे दिल्या जात होत्या.
रिक्षा चालकांकडून नेहमीचीच लूटमार
मेगाब्लॉक प्रीप्लान असूनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाकडून कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून आले. कल्याणहून डोंबिवली रिक्षा प्रवाशासाठी रिक्षा चालकांकडून प्रवाशांची नेहमीप्रमाणे लूटमार करण्यात आली. मीटरप्रमाणे रिक्षा चालविल्या जात नव्हत्या. रिक्षाचालक प्रवाशांकडून दोनशे ते तीनशे रूपये असे चौपट भाडे उकळले होते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मेगाब्लॉक अथवा रेल्वेचा गोंधळ रिक्षा चालकांकडून नेहमीच प्रवाशांची लूटमार केली जाते. मात्र या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओचे कोणताही धाक नसल्याचेच दिसून येते.
केडीएमटीकडून विशेष बससेवा
मेगाब्लॉकमुळे कल्याण डोंबिवली प्रवासासाठी केडीएमटीकडून विशेष २० बस सोडण्यात आल्या होत्या. कल्याण स्टेशनहून व डोंबिवली बाजीप्रभू चौकातून प्रत्येकी १० मीनटाने बसेस सोडण्यात आल्या. मात्र पत्रीपूलावरील वाहतूक कोंडीत बसेस अडकल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. त्यामुळे वयोवृध्द व महिलांना त्रास सहन करावा लागला.
कल्याण- ठाणे एसटी प्रवासाला प्राधान्य
कल्याणहून मुंबईकडे जाणारा मार्ग बंद असल्याने कर्जत व कसारा लोकल कल्याणकडे थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्जत व कसाऱ्यातील प्रवाशांनी कल्याणला उतरून पुढील प्रवास बसने केला. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची खूपच गर्दी झाली होती. एसटी महामंडळाची कल्याण- ठाणे एसटी बस सेवा असल्याने प्रवाशांनी कल्याणहून ठाण्याला एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य दिले.