close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला; शिवसेनेचा भाजपला टोला

तुम्ही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावरून बोलायला लागलात, तर कसे होईल?

Updated: Oct 23, 2019, 01:28 PM IST
स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला; शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक प्रश्नांऐवजी पाकिस्तान आणि कलम ३७० पुरता मर्यादित राहिल्याने राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली, असा टोला शिवसेनेकडून भाजपला लगावण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरण्याला राजकीय पक्षांचा प्रचार कारणीभूत असल्याचे म्हटले. 

पाकिस्तानविषयी केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे लोकांना आधीपासूनच ठाऊक आहे. या मुद्द्यावरून जनतेने लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान केले. तसेच राम मंदिराचा प्रश्नही लोकसभेच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. तेव्हा याच मतदारांनी शिवसेना- भाजपला मते दिली. 

त्यामुळे लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांतील प्रचाराचे मुद्दे हे वेगळे असायला हवेत. तुम्ही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावरून बोलायला लागलात, तर कसे होईल? सर्व राजकीय पक्षांनी याचा विचार करायला पाहिजे. यंदा प्रचारात स्थानिक मुद्द्यांचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी अनस्था दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, त्याऐवजी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. यामुळे नागरिकांमध्ये नैराश्य आले आहे का? त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे का?, या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले. 

टीव्हीवर सेलिब्रिटींना मतदान करताना दाखवले जाते. ते पाहून अनेकांना मतदान व्यवस्थित होत आहे, असे वाटते. मात्र, ग्रामीण भागात चिखल तुडवत मतदान केंद्रापर्यंत पोहोचणाऱ्या मतदारांकडे कोणाचेही लक्ष नसते. हे मतदार बूथपर्यंत कसे पोहोचतील, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली.