मुंबई: नवसाला पावणार गणपती अशी ख्याती असल्यामुळे एरवी लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची लागलेली मोठी रीघ ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र, रविवारी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना एका वेगळ्याच कारणामुळे रांग लावण्याची वेळ आली.
गिरगाव चौपाटीकडे जाण्यासाठी लालबागचा राजा आज सकाळी मंडपातून निघाला. यावेळी राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल, दागिने आणि पाकीटे लंपास केली. त्यामुळे अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, भाविकांची ही संख्या इतकी जास्त होती की काळाचौकी पोलीस ठाण्याबाहेर तक्रार करण्यासाठीही मोठी रांग लागली. आपली तक्रार देण्यासाठी भाविकांना तब्बल दोन ते तीन तास लागत होते. अखेर ही परिस्थिती पाहून सध्या काळाचौकी पोलीस ठाण्यात या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी पाच डेस्क स्थापन करण्यात आले आहेत.