मुंबई : दैनिक सामना या वृत्तपत्राच्या संपादकपदी सौ. रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आता 'सामना'ची भाषा आणि दिशा बदलणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, ही केवळ चर्चा होती, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. सामनातील भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान, त्याआधी संजय राऊत यांनीही भूमिका स्पष्ट केली होती. रश्मी ठाकरे या 'सामना'च्या संपादक होणे ही एक व्यवस्था आहे. मात्र 'सामना'चा तसेच संजय राऊत यांच्या स्वभावाला कुणी वेसन घालू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. ते दिल्लीत बोलत होते.
सर्व शेतकऱ्यांचे दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ करणारच, तसेच शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. दहा लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे, सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. गेल्या दोन महिन्यात पहिली यादी जारी केली. दुसरी यादी पण जारी केली. विदर्भातील पाच लाख शेतकरी कर्जमाफीची यादी तयार आहे, मात्र गडचिरोली, अमरावती, नंदुरबारसारख्या जिह्यातील स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जाहीर केली नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच येत्या सात मार्चला मी प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावे. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
"येत्या ७ तारखेला मी अयोध्येला जातो आहे, राम मंदिरात जातोय, श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. हे मी एका श्रद्धेने करतोय, एका भावनेने करतोय."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/w5aC6xSXVH— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 3, 2020
मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी भाष्य केले. मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा माझ्यासमोर आलेला नाही. मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु, उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.