मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी सीआरपीएफच्या जवानांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेचमंगेशकर कुटुंबातील सदस्यांकडून ११ लाक रुपये आणि मास्टर दीनानात मंगशेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे ७ लाख रुपये असे १८ लाख रुपये शहिदांच्या कुटुंबीयांना 'भारत के वीर' या ट्रस्टअंतर्गत दिले जाणार आहेत.
पुण्यातील नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारे हे पुरस्कार २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात शहीदाना श्रद्धांजली स्वरूप लता दीदी, त्यांचे वडील मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची घोषणा हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी केली.
सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. यावर्षीच्या विजेत्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. तसेच या वर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चापेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना तर चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले जाईल. साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वाग्विलासिनी पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना गृह मंत्रालयाअंतर्गत भारतीय जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था ‘भारत के वीर’ साठी सम्मानित केले जाणार आहे.