मोदीजी, काही करून दाऊदला पकडून भारतात आणा- रोहित पवार

दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. 

Updated: Aug 23, 2020, 01:45 PM IST
मोदीजी, काही करून दाऊदला पकडून भारतात आणा- रोहित पवार title=

मुंबई: १९९३ सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीमध्ये लपून बसल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्ताननेच आता दाऊद कराचीमध्ये असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यासाठी कोणतीही किंमत मोजून दाऊदला भारतात आणावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दाऊद कराचीमध्येच, पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली

पाकिस्तानने दहशतवादी कारवायांशी जोडल्या गेलेल्या ८८ नेते आणि दहशतवादी गटांशी जोडल्या गेलेल्या सदस्यांवर कारवाई केली आहे. या ८८ जणांची यादी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केली आहे. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि जकीउर रहमान लखवी यांच्या नावाचा समावेश आहे. 

मात्र, या सगळ्यावरून गदारोळ निर्माण झाल्यावर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे घुमजाव केले. आता पाकिस्तानकडून दाऊद कराचीमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले.