देवेंद्र कोल्हटकर / मुंबई : आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मात्र मराठी साहित्यिकांकडे बघण्याचा आपल्या प्रशासनाचा दृष्टिकोन कसा आहे, हे दाखवणारी एक बातमी. 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) आपल्या पत्नीसह सध्या उपोषणाला बसलेत. काय आहे कारण? (Literary Laxman Gaikwad's fast, fight against the Maharashtra Government)
'उचल्या' या कादंबरीमुळे सगळ्या महाराष्ट्राला परिचित झालेलं नाव म्हणजे लक्ष्मण गायकवाड. सध्या राज्य सरकारविरोधात लढा देण्याची वेळ त्यांच्यावर आलीये. १९९४ साली सरकारनं त्यांना विशेष बाब म्हणून उदरनिर्वाहासाठी गोरेगाव चित्रनगरीत एक भूखंड दिला होता. त्यावर गायकवाडांनी हॉटेल सुरू केलं. मात्र करार संपल्यानंतर आता हा भूखंड काढून घेण्यात येतोय. त्यांचं पाणी कनेक्शनही तोडण्यात आलंय. जागा सोडण्यासाठी अधिकारी दबाव आणत असल्याचा आरोप करत गायकवाड आपल्या पत्नीसह उपोषणाला बसलेत.
प्रकरण न्यायालयात असतानाही गायकवाड यांच्यावर दबाव आणला जात असल्यावर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी टीका केली आहे. दुभंग, वडार वेदना, वकिल्या पारधी, उठाव, बुद्धाची विपश्यना, उचल्या नंतर अशी साहित्यसंपदा गायकवाडांनी निर्माण केली. साहित्य अकादमी पुरस्कार, सार्क लिटररी अवॉर्ड अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. राज्याच्या सांस्कृतिक खात्यानं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं पावलं उचलावीत, अशी अपेक्षा त्यांचे हजारो चाहते करत आहेत.