लॉकडाऊन : रेल्वेप्रमाणे एसटीतून ५ लाखांहून अधिक परराज्यातील नागरिकांचा प्रवास

 रेल्वेप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही  राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या.  

Updated: Jun 9, 2020, 01:21 PM IST
लॉकडाऊन : रेल्वेप्रमाणे एसटीतून ५ लाखांहून अधिक परराज्यातील नागरिकांचा प्रवास title=
प्रतिकात्मक छाया

मुंबई : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिक  त्यांच्या घरी, त्यांच्या राज्यात परतू इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी म्हणून रेल्वेप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही  राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या. एकूण ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत नागरिकांना रेल्वेस्टेशनपर्यंत तसेच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले. ३१ मे पर्यंतच्या या अभियानात एस.टीबसेस ने तब्बल १५२.४२ लाख किमीचा प्रवास केला.

परराज्यातील नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्यात परतता यावे यासाठी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या... एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्यासाठी राज्य शासनाने  १०४.८९ कोटी रुपयांचा खर्च केला.

औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून  नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली.

दोन लाखाहून अधिक लोकांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवले

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचलप्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एस.टी महामंडळाच्या बसेसने केले. २ लाख २८ हजार १०० नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.

३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले तर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एस.टीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले. या सुविधेचा  ३ लाख  ०९ हजार ४९३ नागरिकांनी  लाभ घेतला.

या जिल्ह्यातूनही परराज्यातील कामगार रवाना

औरंगाबाद प्रदेशातून औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीहून बस उपलब्ध करून देण्यात आल्या. याप्रमाणेच मुंबई प्रदेशातून मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, नागपूर प्रदेशातून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, पुणे प्रदेशातून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक प्रदेशातून अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळमधून बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.