महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मिशन बिगीन अगेनचे नियम कायम

मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा राज्यात सुरु

शैलेश मुसळे | Updated: Jun 29, 2020, 08:12 PM IST
महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मिशन बिगीन अगेनचे नियम कायम  title=

मुंबई : महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात सध्या जे नियम लागू आहेत तेच नियम राहणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची होणारी वाढ आणि संसर्ग यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं होतं. राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल असं त्यांनी जनतेला संबोधित करत असताना म्हटलं होतं. त्यामुळे मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा राज्यात सुरु झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजार रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारसाठी हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला होता. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच लांबचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येणार आहे. मात्र मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तिचं असणार आहे.

दुसरीकडे २ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे शहर पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी देखील लॉकडाऊन करण्यात येईल याकडे देखील लक्ष असणार आहे.

राज्यात मुंबईसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय निर्णय घेण्यात येतो हे पाहावं लागेल.