अजित मांढरे / मुंबई : माहीम पोलिसांनी रमेश भट आणि त्याच्या कुटुंबियांना हजारो गुंतवणूकदारांना सुमारे ८० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केलीय. सर्वात भरवशाची गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्ट खात्यात पैसे गुंतवून ही फसवणूक करण्यात आलेय.
रमेश भट, त्याचा जावई सागर मोहिरे आणि त्याची मुलगी भूमिका मोहिरे, त्याचा मुलगा हुंकार भट असा भट परीवार. या रमेश भटने माहिम येथील पोस्ट खातेधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार माहीम पोलीस स्टेश मध्ये दाखल करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रमेश भट हा पोस्टाचा अधिकृत एजंट आहे. त्यामुळे या पोस्ट खात्यात त्याची वरपर्यंत ओळखी आहेत.
५ ते १० वर्षे या रमेश भटच्या माध्यमातून राजेश पोतदार, स्मिता सातर्डेकर, रत्नप्रभा शेट्ये सारख्या शेकडो सामान्य लोकांनी पोस्टात पैसे भरले. खातेधारकांनी पैसे भरलेली ५ आणि ७ वर्षांची स्कीम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक खातेधारकाचे किमान ५ ते १५ लाख रुपये जमा झाले होते. पण आता खातेधारकांच्या खात्यात फक्त १०० रुपये पासून ८ ते १० हजार रुपये जमा आहेत.
कारण रमेश भट खातेधारकांकडून घेतलेल्या रकमेपैकी ९५ ते ९९ टक्के रक्कम पोस्टात भरायचाच नाही. पण पोस्टखात्याच्या पासबूकवर आणि त्याच्या कम्प्युटरवर मात्र तो पूर्ण पैसे भरण्याची नोंद करायचा. रमेश भट हा एकटाच फक्त पोस्ट खात्याचा एजंट नव्हता तर त्याच्या परिवारातील जवळपास सर्वच सदस्य पोस्ट खात्याचे अधिकृत एजंट होते.
जुना एजंट असल्याने माहीम पोस्ट खात्यात रमेश भटची चलती होती. त्यामुळे रमेश भट मार्फतच पैसे गुंतवा असा सल्ला पोस्ट अधिकारीच लोकांना द्यायचे. त्यानुसार रमेश भटने सुरुवातीला शेकडो खातेधारकांना पोस्ट खात्यापेक्षा जास्त व्याज देऊन खातेधारकांचा विश्वास संपादन केला.
पण मुळात रमेश भट खातेधारकांचे पैसे पोस्टात भरायचाच नाही तर तो खातेधारकांचेच पैसे एकमेकांना व्याज म्हणून फिरवायचा आणि कोट्यवधी रुपये जमताच पैसे घेऊन पोबारा केला,अशी तक्रार मुंबई पोलिसात करण्यात आली आहे.
खरं तर रमेश भट आणि पोस्ट खात्यांतील अधिकाऱ्यांच्या फसवणुकीच्या धंद्याची माहिती पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही वर्षांपूर्वीच मिळाली होती पण, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता मुंबई पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. निदान मुंबई पोलीस तरी योग्य तपास करुन खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर परत करतील, अशी अपेक्षा खातेधारकांना आहे.