मुंबईत गेल्या ६ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

मुंबईमध्ये सध्या महाबळेश्वरचा अनुभव नागरिक घेत आहेत.

Updated: Jan 17, 2020, 05:45 PM IST
मुंबईत गेल्या ६ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांनी आज कुडकूडत्या थंडीचा खऱ्या अर्थानं अनुभव घेतला. आज पारा १२ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला होता. गेल्या ६ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद आज मुंबईत झाली आणि आजची थंडी ही विक्रमी ठरली. 

नेहमी घामाच्या धारांची सवय असलेल्या मुंबईकरांना सध्या गुलाबी थंडीचा मस्त अनुभव येतो आहे. मुंबईचा पारा शुक्रवारी १२ अंशांच्या खाली उतरला होता. या थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक मुंबईकर मॉर्निंग वॉकला बाहेर पडले... कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनीही स्वेटर, कानटोप्या, मफरल असं पॅकिंग केल्याचं दुर्मिळ चित्र मुंबईत पहायला मिळालं.

कडाक्याची थंडी म्हटली की वाफाळलेला चहा हवाच. त्यामुळे मुंबईकरांची पावलं आपोआप चहाच्या टपऱ्यांकडे वळत होती. मुंबईकरांचा तसा स्वेटरशी संबंध नाही. मात्र अचानक पडलेल्या थंडीमुळे स्वेटर विक्रेत्यांचा धंदाही तेजीत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रात आगामी काही दिवस गारवा जाणवेल. आता तापमानात थोडी वाढ होईल. मात्र नाशिक आणि जळगावमध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. 

केवळ रात्री आणि पहाटेच नव्हे, तर भर दुपारीही गारवा जाणवतो आहे. संध्याकाळच्या वेळी मुंबई आणि उपनगरांमध्ये थंडगार वारे वाहत आहेत. त्यामुळे सध्या मुंबईमध्येच महाबळेश्वरचा अनुभव नागरिक घेत आहेत.