Maharashtra Assembly : बंडखोरी करून भाजपच्या (BJP) साथीने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची (Shinde Government) आज पहिली कसोटी आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकार आज अध्यक्षपदाची निवड आणि विश्वासदर्शक ठराव या माध्यमातून शिंदे सरकार शक्तीप्रदर्शन करेल.
आज अध्यक्षांची निवड आणि सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. विधानसभेत सरकारला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. त्यामुळे राहुल नार्वेकर निवडून येण्यात अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचं आहे.
अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह विधानभवना दाखल झाले आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. विधानभवनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं.
विधानसभा अध्यक्षपदी शिंदे गट-भाजपचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी भगवे फेटे परिधान करत शक्तीप्रदर्शनही केलं. भाजपचे 106 तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण 120 आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह 46 आमदार आहेत. विधानसभेत सरकारला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विधान भवनात दाखल झाले आहेत. विधान भवन परिसरात भाजप शिवसेना यांनी झेंडे लावत शक्तीप्रदर्शन केलंय. नव्या सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. त्याआधी दोन्ही पक्षांनी इथे झेंडे लावत हा परिसर भगवा करून टाकला.