Maharashtra Bandh : उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खीरी (Lakhimpur Khiri Violence) घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेनं (Shiv Sena) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Bandh) राज्यात काही ठिकाणी कडकडीत तर काही ठिकाणी संमीश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी या बंदला हिंसक गालबोट लागलं.
मुंबईत बंद दरम्यान काही अज्ञातांकडून 8 बेस्ट (BEST) बसेसची तोडफोड करण्यात आली. धारावी, शिवाजी नगर, देवनार, मालवणी इथं बेस्ट बसेसची तोडफोड झाल्याची माहीती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. बंद दरम्यान, मुंबईत तुरळक प्रमाणात बेस्ट बसेस धावत होत्या. तरीही तोडफोड झाल्याने बेस्ट प्रशासनानं पोलिस संरक्षणाची मागणी केली.
विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर शिवसैनिकांनी रास्तारोको करत टायर जाळले, त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ठाण्यात बंदला प्रतिसाद मिळत नसल्यानं शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे ठाण्याचे उपमहापौरही बंद करताना मारहाणीत सहभागी झाले होते. बंद यशस्वी करण्यासाठी सेना राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आणि बाजारपेठेत एकत्र फिरून दुकानं बंद केली तर दुकानं, हॉटेलचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपेही बंद करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरले होते.
कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा सुरुचं ठेवल्याने शिवसैनिकांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली.
उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.
पुण्यात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. नाशिकमध्येही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी निदर्शनं केली. रस्त्यावर उतरुन दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. तर नागपुरात महाविकास आघाडीनं रास्तारोको केला. औरंगाबादमध्ये जबरदस्तीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न झाला. तर कोल्हापुरात पुणे- बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला..
बुलडाण्यात एका दुकानदारानं बंदला विरोध केला म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला कोंडून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार घडला. जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट इथं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करत होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदारानं आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शवला, त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते आक्रमक झाले. त्यांनी बळजबरीनं दुकान बंद केलं आणि दुकानदाराला आत कोंडून ठेवलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महा विकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागलं. महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरूळपीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून रॅली काढण्यात आली. अकोला-नांदेड रोडवर पुसद नाक्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
यवतमाळमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंदचं आवाहन केलं. त्याचा फारसा परिणाम झाला नाही. थोडावेळ शटर खाली करुन मग पुन्हा दुकानं सुरु झाली. नवरात्रीमुळे बाजारपेठेत लगबग होतीच. आझाद मैदान चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली.