Maharashtra Budget 2020 : राज्यात पेट्रोल महागणार

महाराष्ट्र राज्यात पेट्रोल एक रूपयाने महागणार आहे.  

Updated: Mar 6, 2020, 02:09 PM IST
Maharashtra Budget 2020 : राज्यात पेट्रोल महागणार title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात पेट्रोल एक रूपयाने महागणार आहे. राज्य सरकारने पेट्रोलवर प्रती लीटर एक रूपया व्हॅट लागू केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सुमारे १८०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. राज्यात बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात घट केली आहे. एमएमआरडीए क्षेत्र, पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात २ वर्षांसाठी १ टक्का मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे.

८० टक्के स्थानिकांना नोकऱ्या, कायदा करणार

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकासआघाडीचं पहिलं बजेट मांडलं. या बेजटमध्ये शेतरी आणि रोजगारावर भर देण्यात आलीय. दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती योजनेची ठाकरे सरकारनं घोषणा केली होती. मात्र या योजनेची व्याप्ती वाढवल्याची घोषणा अजित पवारांनी केलीय. आता दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचेही दोन लाख रुपये माफ होणार आहेत. तसंच नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यांचे ५० हजार रुपये माफ होणार आहेत.

अर्थसंकल्पात उद्योग विभाग

तसेच जलयुक्त शिवार योजना रद्द करून त्याऐवजी मुख्यमंत्री जलसंधारण योजना सुरू करण्यात येणार आहे. तर रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी १ टक्के मुद्रांक शुल्क कमी करण्यात आलाय.

सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राखली असून ५० कोटींच्या निधीची तरतूद केलीय. पर्यटन खात्याला पहिल्यांदाच १ हजार कोटींची तरतूद केलीय. मात्र या बजेटमध्ये नवीन कोणतीही घोषणा नसून भाजप सरकारच्याच काळातल्या योजनांचं नाव बदलण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

१. राज्यात पेट्रोल महागणार, पेट्रोलवर राज्य सरकारने १ रूपया व्हॅट वाढवला, घरखरेदीत मुद्रांक शुल्कात २ वर्षांसाठी १ टक्के सवलत

२. दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, वरील रक्कम भरल्यानंतर सरकार २ लाखांचं कर्ज माफ करणार, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

३. फडणवीस सरकारची जलशिवार योजना रद्द करून नवी मुख्यमंत्री जलसंधारण योजना, जलसंपदा विभागासाठी १०,२३५ कोटींची तरतूद

४. संपूर्ण ऊस शेती येत्या ३ ते ४ वर्षात ठिबक सिंचनाखाली आणणार, पिकविम्यासाठी २०३४ कोटी, कृषी पशूसंवर्धन दुग्धविकासासाठी ३२५४ कोटी रूपयांची तरतूद

५. आमदार निधीत अजित पवारांनी पुन्हा केली वाढ, आमदार निधी २ कोटीहून तीन कोटींवर, यापूर्वी अजित पवारांनीच दीड कोटीवरून २ कोटींवर नेला होता निधी

६. बहुजन कल्याण विकासासाठी अर्थसंकल्पात ३ हजार कोटी, सारथी योजनेसाठी ५० कोटींचा निधी

७. कोकणच्या विकासासाठी ठाकरे सरकारचे प्राध्यान्य, रेवत ते रेड्डी महामार्गावर खाडीपूल, काँक्रिटीकरण, ३ वर्षात काम पूर्ण करणार

८. पुणे शहराबाहेर १७० कोटींचा रिंगरोड, १२०० कोटींचा निधी सरकारकडून, अजित पवारांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अभिनंदन

९. गावोगावी नव्या कोऱ्या एसटी बसेस धावणार, महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बस बदलणार. १६०० नव्या बसची खरेदी होणार, गावोगावी वायफाययुक्त अत्याधुनिक बस धावणार

१०. महिला आणि जेंडर बजेट प्रथमच, प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयात महिला पोलीस ठाणे उभारणार, १००० कोटींपर्यंतची खरेदी महिला बचत गटांकडून, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करणार

११. मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर पडणार, हाजी अली विकास आराखडा, वरळीत आकर्षक मत्स्यालय उभारणार, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन, पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागासाठी १ हजार ४०० कोटींचा निधी