मुंबई : आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी भाजप आमदारांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विधिमंडळाच्या बाहेर भाजप आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे घोषणा दिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी कथित संबधांमुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने जोरदार घोषणा दिल्या.
राज्यसरकारनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजाराचं आणि कोरोनाचं निमित्त पुढं करून दरवर्षी नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येईल असं सांगून बोळवण केली होती.
मात्र, पुढचं अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे न घेता मुंबईतच घेण्याचं ठरलं. याचं कारण देताना संसदीय कार्य मंत्री अनिल परब म्हणाले, राज्य सरकारचा मानस होता की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं पाहिजे. पण, विधीमंडळ सचिवालयाने जी माहिती पाठवलेली आहे, त्यानुसार राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपूरमध्ये संयुक्त सभागृह उपलब्ध नाही. तिथलं आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे तिथे अधिवेशन घेणं शक्य होणार नाही.
आता अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेर मुंबईतच होतंय. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार विधिमंडळातल्या कामकाजाला फारसं महत्व देत नाही असा नाराजीचा सूर विरोधी पक्ष भाजपानं सातत्यानं लावलाय.