Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) यांचं सरकार स्थापन होऊन महिनाभरापेक्षा जास्त वेळ उलटून गेलाय, त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार राहिलेला आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नेमप्लेट लावण्यात आली.
मात्र मुख्यमंत्री शिंदे आधीच्याच नंदनवन बंगल्यात आपला मुक्काम ठोकणार आहेत. त्यामुळे 'वर्षा' बंगल्याचा वापर केवळ कार्यालयीन बैठकांपुरताच करण्यात येणार आहे.
राज्याच्या राजकारणात वर्षा बंगल्याला सर्वाधिक महत्त्व आहे. जो मंत्री होतो तो एक दिवस 'वर्षा' बंगल्यावर जाण्याचं स्वप्न पाहतोच पाहतो. आणि हा बंगला मिळाल्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यानं इथं राहण्याची संधी सोडलेली नाही. मुळातच 'वर्षा' बंगल्याचा इतिहास मोठा रंजक आहे.
'वर्षा' बंगल्याचा इतिहास
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्री' बंगला हे अधिकृत निवासस्थान केले होते. चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक हे कृषिमंत्री होते. त्यांच्या वाट्याला 'डग बीगन' हा बंगला आला.
पुढे कन्नमवारांचं अचानक निधन झाल्यानंतर वसंतरावांर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. वसंतरावांनी डग बीगनमध्येच राहायचा निर्णय घेतला. मात्र त्या बंगल्याचं नाव बदलून त्यांनी वर्षा असं केलं. त्यानंतर 1963 पासून हाच वर्षा बंगला पुढे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान झाला.
वर्षावर न राहणारे केवळ एकनाथ शिंदेच नाहीत
वसंतराव नाईक यांच्यानंतरचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपला निवास 'सह्याद्री'वर नेला. त्यानंतर शरद पवारांनीही 1978 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 'रामटेक'मधला मुक्काम कायम ठेवला. मात्र शरद पवारांनी पुढील तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरच मुक्काम हलवला.
त्यामुळेच प्रत्येक मंत्र्याचं एक दिवस 'वर्षा' बंगला मिळवण्याच स्वप्त असतं. मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र हे आता 'वर्षा' नसून 'नंदनवन' असणार आहे.