ठरलं, शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालयं 'या' तारखेपासून होणार सुरु

कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

Updated: Jan 25, 2022, 08:59 PM IST
ठरलं, शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालयं 'या' तारखेपासून होणार सुरु title=

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालयं (College Reopen) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. 

येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यलायं सुरु करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करुन महाविद्यालयं सुरु करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत ट्विट करत उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.'

शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याच्या हालचाली सुरु होत्या. उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला अखेर मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. 

कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरणही (Vaccination) बऱ्यापैकी झाल्याने महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन सकारात्मक होतं. 

महाविद्यालयं सुरु होत असली तरी विद्यार्थ्यांना उपस्थिती लावण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे.