अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात.
हा मेसेज केलाय कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी. कारागृह विभागाच्या व्हॉटसप ग्रुपवर स्वाती साठे यांनी हा मेसेज केला. महिला कैदी मंजूला शेट्येला मारहाण आणि हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या ६ महिला जेल पोलिसांच्या समर्थनार्थ त्यांनी हा मेसेज होता. या मेसेजचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला. या मेसेजनंतर स्वाती साठे यांनी कारागृह प्रशासनाच्या व्हॉटसप ग्रुपवर आणखी एक मेसेज पाठवला.
त्यांनी केलेले हे २ मेसेज ग्रुपमधल्या अनेकांनी वाचले. मात्र, कोणीच रिप्लाय केला नाही, त्यामुळे स्वाती साठेंनी पुन्हा तिसरा मेसेज केला.
स्वाती साठेंनी असे मेसेज करणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ज्या महिला कैदी मंजूला शेट्येला अमानुष मारहाण करण्यात आली. त्या महिला कैदी मंजूला शेट्ये हत्या प्रकरणाची कारागृह विभागामार्फत चौकशीची जबाबदारी स्वाती साठेंकेडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आरोपी महिला जेल पोलिसांची पाठराखण करणं, त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
स्वाती साठे यांनी असा मेसेज करणं हे चुकीचं असल्याचं अनेक बड्या अधिका-यांचं म्हणणं आहे. ज्या सहा महिला जेल पोलिसांना अटक झालीय, त्यांच्या जामिनासाठीही स्वाती साठेंनी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज केला आणि सगळ्यांकडून पाचशे ते हजार रुपये मागितल्याची तक्रारही ठाणे जेलचे अधीक्षक हिरालाल जाधवांनी केलाय.
या प्रकारानंतर स्वाती साठेंचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. निलंबनाच्या कारवाईतून वाचण्यासाठीच स्वाती साठेंनी पत्र लिहिल्याचं बोललं जातंय. दरम्यान आता मंजुला शेट्ये प्रकरणाचा तपास कारागृह महानिरीक्षक राज्यवर्धन सिन्हा यांच्याकडे देण्यात आलाय.