माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून प्रवासासाठी ४५ लाखांचा खर्च

बहुतांश वेळा विद्यासागर राव यांनी विमानाने प्रवास केला. 

Updated: Jan 8, 2020, 06:39 PM IST
माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून प्रवासासाठी ४५ लाखांचा खर्च title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रवासासाठी तब्बल ४५ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विद्यासागर राव राज्यपाल असताना त्यांनी किती दौरे केले, याचा तपशील मागवला होता. या माहितीनुसार, सी. विद्यासागर राव यांनी पाच वर्षांच्या काळात २१४ दौरे केले. यापैकी ८३ वेळा ते हैदराबादला तर २२ वेळा चेन्नईला गेले होते. त्यांच्या या देशांतर्गत प्रवासासाठी तब्बल ४५ लाख रुपयांचा खर्च झाला.

राज्यपालांना राज्य व भारत दौर्‍यासाठी राज्य अतिथीची सुविधा दिली जाते. विद्यासागर राव यांच्या दौऱ्यांसाठी २ जानेवारी २०१५ ते ३ सप्टेंबर २०१९ या ५७ महिन्यांत एकूण ४५ लाख ३ हजार ६५१ रुपये हवाई, रस्ते आणि बोटीच्या प्रवासावर खर्च झाले आहेत. यापैकी बहुतांश वेळा विद्यासागर राव यांनी विमानाने प्रवास केला. 

यापैकी ८३ वेळा ते हैदराबादमध्ये गेले होते. तसेच काही प्रवास चेन्नई, विजयवाडा, अमरावती आणि तिरुपती येथील आहे. याशिवाय, विद्यासागर राव यांच्या चेन्नईला एकूण २२ फेऱ्या झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

या सगळ्याची मांडणी करायची झाल्यास सुरुवातीच्या तीन वर्षात विद्यासागर राव यांनी मोठ्याप्रमाणावर प्रवास केला. २०१५ मध्ये ५४, २०१६ मध्ये ५३ आणि २०१७ साली विद्यासागर यांनी ४९ वेळा प्रवास केला. तसेच २०१८ आणि २०१९ मध्ये विद्यासागर राव यांनी अनुक्रमे ३६ आणि २२ वेळा प्रवास केला. महिन्यातील किमान ३ ते कमाल १५ दिवस विद्यासागर राव महाराष्ट्राबाहेरच राहिल्याचे या तपशीलावरून स्पष्ट होत आहे. 

राज्यपालांवर झालेला खर्च हा सार्वजनिक करातून वसूल होतो. त्यामुळे राजभवनाच्या संकेतस्थळावर ही माहिती खर्चासह नमूद करायला पाहिजे. जेणेकरून सामान्य लोकांना राज्यपालांच्या कामकाजाबद्दल सहज माहिती मिळू शकेल, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली.