'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी

Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.  

राजीव कासले | Updated: Jul 5, 2024, 07:01 PM IST
'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी title=

Team India Satakar : टी20 विश्व विजेत्या टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही घोषणा केलीये. विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. चौघांचंही विधीमंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.  तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही जगज्जेत्या संघाचं कौतुक केलं.

देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी
खेळाडूंच्या सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपले व्हाईस कॅप्टन अजित पवार, अंपायर निलमताई गोऱ्हे अशी सुरुवात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अपारजित भारतीय टीमने टी20 चा वर्ल्ड कप जिंकला. त्यातल्या चार खेळाडूंचं स्वागत करण्याची संधी आपल्याला मिळालीय.  कर्णधार रोहित शर्माने आपल्याला एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दु:खही दिलं. आपल्याला विश्वविजेता होऊन मोठा आनंद दिला. पण त्याच दिवशी टी20 मधून निवृत्त होत दु:खही दिलं. कपिल देव आणि एमएस धोनीनंतर रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकण्याची कमाल केली आहे अशा शब्दात फडणवीस यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं.

'रोहित शर्माकडून शिकावं'
राजकीय नेत्यांनी रोहित शर्माची पत्रकार परिषद पाहिली पाहिजे कमीत कमी बोलून आपल्या बॉ़डी लँग्वेजनमधून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून आपल्याला शिकता येईल असा टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला. टी20 क्रिकेटमधला तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत, पण सर्वात महत्त्वांच म्हणजे एक कर्णधार म्हणून त्याने त्याच्या संघाचा मिळवलेला विश्वास, संघातील कोणत्याही खेळाडूला रोहित शर्माबद्दल विचारल्यास ते आदराने आणि प्रेमाने रोहितचं नाव घेतात असं फडणवीस म्हणाले.

संघ लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे, कठोर वागलं तरी आपल्या टीम मेंबरच्या मनातील विश्वास जिंकता आला पाहिजे, आमचा कर्णधार हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो. टीम इंडियाला उत्तम कर्णधाराची परंपरा आहे, त्यात चार चाँद जोडण्याचं काम रोहित शर्माने केलंय असं कौतुक पडणवीस यांनी केलं. 

महाराष्ट्राला तुमचा अभिमान असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचेही आभार मानले. मुंबई पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं. मुंबईकरांचं प्रेम ओसंडून वाहत होतं, पण इतकी गर्दी होऊनही मुंबईकरांनी आपली शिस्त मोडली नाही. 

'मुंबईला नव्या स्टेडिअमची आवश्यकता'
मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडिअमची आवश्यकता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला जी काही मदत लागेल ती आमचे मुख्यमंत्री करतील. वानखेडे स्टेडिअम ऐतिहासिक आहे, पण मुंबईसाठी एक आधुनिक, एक लाख प्रेक्षक क्षमता असलेलं स्टेडिअम येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं अशी विनंती फडणवीस यांनी केली. आमच्या डकवर्थ लुईसचा नियम आहे, कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही. पण हे जरी असलं तरी आज आम्ही सर्व एकत्र आहोत, सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे तो म्हणजे आपला भारत जिंकला आहे असं सांगत फडणवीस यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.