Maharashtra Unlock Guidlines : देशासह राज्यात कोरोनाचा (Corona) आलेख कमालीचा घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना (New Guidlines) जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होतील. कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला असून अ श्रेणीत 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे.
या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोणते निर्बंध शिथिल होणार?
1 - शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी
2 - सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रम संबंधित हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेनं घेण्यास परवानगी
3 - राज्यातील सरकारी आणि खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीची परवानगी
४ - शाळा पूर्ण क्षमतेने आणि पूर्णवेळ सुरु करण्यास परवानगी
५ - लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले
कोणत्या निकषांवर निर्बंध शिथिल?
निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत, त्यानुसार
- लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त
- दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त
- पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी हवा
पूर्ण लसीकरणाची अट
निर्बंध शिथिल करतानाच राज्य सरकारने संपूर्ण लसीकरणाची अट ठेवली आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, पर्यटन, रेस्टॉरंट, क्रीडा मैदाने, होम डिलीव्हरी करणारे या सर्वांना लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असणार आहे.