लॉकडाऊन : दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द

कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती.  

Updated: Jul 4, 2020, 10:38 AM IST
लॉकडाऊन : दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती. दोन किमी परिसरात नागरिकांनी खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून दोन किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन किलोमीटरच्या क्षेत्रात मुंबई पोलिसांच्या आदेशानंतर विनाकारण बाहेर पडणे शक्य होत नव्हते. कंटेन्मेंट झोन असल्याने कडक निर्बंध होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी अनेकांचा विरोध असल्याचे सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, तर दोन किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान,  मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्र वारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राजकीय गोंधळामुळे ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करत हा तिढा सोडविला. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी, समाज माध्यमातून ‘घराजवळच खरेदी करा, व्यायामासाठी घराजवळील मोकळ्या जागेत जा, असे नवे आवाहन शुक्रवारी केले. तर मुंबईत निर्बंध लागू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतही दोन किमी क्षेत्रात मर्यादा घालण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

दरम्यान, या वादावर पडदा टाकण्याचे काम आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. प्रवासासाठी फक्त दोन किमी अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रि या उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.