कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढणार, राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार

लवकरच एवढे टक्के कर्मचारी उपस्थित राहणार

Updated: Jul 8, 2020, 08:45 PM IST
कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढणार, राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्याबाबत आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सध्या मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी उपस्थित असतात. ही उपस्थिती ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्य सरकारने शासकीय कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर मर्यादा घातली होती. 

लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा ही उपस्थिती ५ टक्के ठेवण्यात आली होती. त्यानंतर सरकारने अनलॉक आणि मिशन बिगेन अगेन जाहीर केले. तेव्हा शासकीय कार्यालयातील उपस्थिती १५ टक्के करण्यात आली. आता ही उपस्थिती ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. 

राज्य सरकारच्या कामाला गती द्यायची असेल तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे. काही कर्मचारी तर लॉकडाऊनपासून कामावर आले नसून घरी बसून पगार घेत आहेत. एकीकडे सर्व व्यवहार सुरू करण्याची भाषा सरकार करत असताना शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे.