शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! महाराष्ट्रात रेडीरेकनेर संदर्भात मोठी घोषणा

New Ready Reckoner Rates: महाराष्ट्र सरकारने नव्या रेडीरेकनेर दरांची घोषणा केली आहे. राज्याच्या उप-सचिवांनी यासंदर्भातील निर्देश मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्यांना दिले आहेत.

Updated: Mar 31, 2023, 04:50 PM IST
शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! महाराष्ट्रात रेडीरेकनेर संदर्भात मोठी घोषणा title=
New Ready Reckoner Rates (Photo- Reuters/ANI)

Maharashtra Ready Reckoner Rates: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने रेडीरेकनेर दरांमध्ये (Ready Reckoner Rates) कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार नाहीत. मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच सन 2022-23 मधील रेडीरेकनर दर 2023-24 च्या आर्थिक वर्षात कायम राहणार आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याचे उप-सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रकांना पाठवलं आहे. 

महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे बास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम 1995 मधील नियम 4 च्या उपनियम (9) च्या तरतूदीनुसार शासनाने रेडीरेकनर दरांबद्दलचे निर्देश दिल्याचं राज्याच्या उप-सचिवांनी या पत्रात म्हटलं आहे.. "वर्ष 2022-23 चे वार्षिक दर विवरणपत्रात कोणताही बदल न करता वर्ष 2023-24 मध्ये चालू ठेवण्यात यावे," असे निर्देश देण्याचा शासनाचा आदेश असल्याचं बजाज यांनी नमूद केलं आहे. तसेच विकासक व इतर सामान्य नागिरकांना त्यांच्या मिळकतीच्या दरांबाबत वार्षिक बाजार मुल्य दर तक्त्यामध्ये वाढ किंवा घट करुन देण्याची विनंती अर्ज नियमानुसार निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पाठवलं जात आहे, असंही उपसचिवांनी म्हटलं आहे.

मुंबईबरोबर महामुंबईमध्ये म्हणजेच ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये 3.5 लाखांहून अधिक घरं पडून आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत घरांची विक्री रोडावली आहे. घरांच्या किंमती दिवसोंदिवस वाढत असल्याने दुसरीकडे तयार घरांना अधिक दर असल्याने ग्राहकच मिळत नाहीत. महामुंबईमध्ये साडेतीन लाखांहून अधिक घरं विक्रीशिवाय पडून आहेत. खास करुन मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, पनवेल, भाईंदर, वसई-विरार तसेच पालघरचा समावेश आहे.

सिडको आणि म्हाडामार्फत घेतल्या जाणाऱ्या घरांच्या लॉटरीला काही ठिकांणी अल्प प्रतिसाद मिळत आहे. या लॉटरीमधील घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अनेकांना या लॉटरीमध्ये घरं लागूनही घरांचे पैसे न भरल्याने घरं विक्रीशिवाय पडून असल्याची माहिती समोर आली आहे.