'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती'

राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्‍याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. 

Updated: May 24, 2020, 11:55 PM IST
'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: परराज्यात रेल्वे सोडण्यावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्र सरकार आणि भाजप हा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत. परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी रेल्वेकडून मागणीनुसार गाड्या मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे १२५ गाड्या उद्या द्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी या गाड्यांचा मार्ग, प्रवाशांची यादी प्रत्येकाच्या मेडिकल सर्टीफिकेटसह रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे जमा करावी असं ट्विट करत एक प्रकारे राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. दीड तासाने रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा ट्विट करून ही यादी मिळाली नसल्याचा दावा केला. 

गोयलजी यादी पाठवलेय, फक्त ट्रेन भलत्याच स्टेशनवर पाठवू नका- संजय राऊत

रेल्वे मंत्र्यांच्या या दुसऱ्या ट्विटनंतर राज्यातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्‍याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. रेल्वे मंत्र्यांनी एका तासाचा अवधी दिला होता. मात्र राज्य सरकारने एका तासाच्या आतच १२५ ट्रेनच्या प्रवाशांची यादी दिल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा आहे. या आव्हान आणि दाव्या प्रतिदाव्यांमुळे कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.

वाद नेमका कसा सुरु झाला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे आज संध्याकाळी पियूष गोयल यांनी ट्विट करुन महाराष्ट्रासाठी उद्याच १२५ ट्रेन सोडायला तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र सरकारने एका तासाच्या आत मजुरांची यादी आणि आवश्यक तपशील पुरवावा, असे त्यांनी म्हटले होते. 

उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल

यावर राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत, असा टोला गोयल यांनी लगावला. यादरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये गेल्यावेळी महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे ६५ श्रमिक ट्रेन रद्द कराव्या लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.