मुंबई: श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आज संध्याकाळपासून पियूष गोयल यांच्याकडून महाराष्ट्र सरकारवर सुरु असलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. रेल्वे मंत्रालय मजुरांसाठी सोमवारी महाराष्ट्रात १२५ श्रमिक ट्रेन पाठवायला तयार आहे. मात्र, राज्य सरकार मजुरांचा तपशील देण्यास उशीर करत असल्याने नसल्यामुळे झाल्याचे पियूष गोयल यांनी म्हटले होते. यावेळी गोयल यांनी गेल्यावेळी राज्य सरकारच्या नियोजनाअभावी महाराष्ट्रातून अनेक ट्रेन रिकाम्या परतल्याचा टोलाही लगावला होता. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारक यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
'बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'
अखेर शिवसेनेचा हुकमी एक्का असलेल्या संजय राऊत यांनी ट्विटरवरून पियूष गोयल यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले.
उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी,@PiyushGoyal फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये @AUThackeray @CMOMaharashtra @PawarSpeaks
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 24, 2020
काही दिवसांपूर्वी वसई रोड स्थानकावरून गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ही रेल्वे गोरखपूरला पोहोण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. हा प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वेची चांगलीच नाचक्की झाली होती. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी गोयल यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपण तासाभराच्या आतच मजुरांची यादी पाठवल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आता रेल्वे विभाग त्यावर निर्णय घेऊन उद्या गाड्या सोडेल, अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.