स्वाती नाईक, झी मीडिया, मुंबई : हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेनं (Mns) आणखीच आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या आंदोलनानंतर आता मनसेनं अनधिकृत मदरशांच्या विरोधात मोहीम उघडायचं ठरवलंय. काय आहे त्यामागचं राज आणि कारण. पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra navnirman sena now agressive on illegal madrasa)
हिंदू जननायक बनलेल्या राज ठाकरेंच्या निशाण्यावर आता आहेत मुस्लिमांचे अनधिकृत मदरशे. पनवेल, नवी मुंबई, ठाणे भागात गेल्या काही वर्षांत अनधिकृत मदरशांचं पेव फुटलंय. अगदी निवासी सोसायट्यांमध्ये कोणतीही परवानगी न घेता बेकायदा मदरसे सुरू करण्यात आल्याचं समजतंय. धर्मादाय आयुक्त, महापालिका किंवा पोलिसांची परवानगी देखील या मदरशांनी घेतलेली नाही.
या मदरशांच्या आडून घातपाती कारवाया करणा-या गुन्हेगारांना आश्रय दिला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. हे बेकायदा मदरसे तत्काळ बंद करावेत, अशी आग्रही मागणी देखील मनसेनं पनवेल पोलीस आणि महापालिकेकडं केलीय.
हिंदुत्वाच्या मुद्यावरून गेल्या काही महिन्यात राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी मनसेनं मोठं आंदोलन उभारलं. त्यानंतर 'से नो टू हलाल' म्हणत हलाल मटणाच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आता अनधिकृत मदरसे बंद करण्याची मागणी मनसेनं लावून धरलीय.
हिंदू जननायक अशी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या मनसेची पावलं पडतायत. त्यात ते किती यशस्वी होतायत, ते पाहायचं.