मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडलाय. आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि स्टार नेते (Eknath Shinde) एकनाथ शिंदे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडणाराय. धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा सांगणा-या शिंदेंवर बंडाची वेळ का आली, पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra political crisis shiv sena senior leader rebellious eknath shinde)
एकनाथ शिंदे, शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवून ठेवणारा ठाणेदार. धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा सांगणारे, कट्टर निष्ठावंत शिवसैनिक. पण याच निष्ठावंत शिलेदारानं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय. ते एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत तब्बल ३० आमदार असल्यानं महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.
नगरविकास खात्यासारखं महत्त्वाचं खातं असतानाही एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे..
मुख्यमंत्र्यांशी विसंवाद
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष संघटनेतला सहभाग कमी झाला. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांशी असलेला संवाद कमी झाला. महाविकास आघाडीतील इतर नेते उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले. त्यामुळं आपल्याला डावललं जात असल्याची भावना शिंदेंच्या मनात बळावली...
मुख्यमंत्र्यांचं पुत्रप्रेम
राज्यसभा आणि विधानपरिषदेची रणनीती आखताना एकनाथ शिंदेंना विश्वासात घेण्यात आलं नसल्याचं सांगितलं जातंय. त्यात निर्णयप्रक्रियेत आणि पक्ष संघटनेत आदित्य ठाकरेंचं महत्त्व वाढलं... उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांना बाजूला करून आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे नवे चेहरे धोरणात्मक निर्णय घेऊ लागले..
नगरविकास खात्यात हस्तक्षेप
शिंदेकडील नगरविकास खात्यात इतर मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला होता. प्रत्येक निर्णयासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागायची. त्यामुळं शिंदेंना मनमोकळं काम करता येत नव्हतं, असं समजतंय...
आमदारांना दुय्यम वागणूक
शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आमदारांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार या ना त्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या कानावर घालण्यात आली... मात्र त्यात सुधारणा झाली नाही. विकासकामांसाठी निधीही मिळेना आणि सरकार असल्यानं बोलताही येईना, अशी शिवसेना आमदारांची गत झाली होती...
त्यामुळंच एकनाथ शिंदेंच्या या बंडात शिवसेनेचे ४ मंत्री आणि जवळपास दोन डझन आमदार सहभागी झाल्याचं बोललं जातंय... शिंदेंसमोर आता काय पर्याय उरलेत, त्यावर नजर टाकूया.
शिंदेंसमोरचे पर्याय काय?
शिवसेनेचे 2/3 आमदार फुटल्यास सर्वांची आमदारकी शाबूत राहील. भाजपासोबत सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा होईल. 2/3 पेक्षा कमी आमदार फुटल्यास सर्व आमदार अपात्र ठरतील. त्यामुळं बहुमताचा आकडा खाली येईल. भाजप अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करू शकेल. शिंदे आणि समर्थक आमदार निवडणूक लढवून भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील.
शिवसेनेच्या इतिहासातलं हे चौथं मोठं बंड आहे. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडलंय. पण या बंडामुळं ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.