आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) लक्ष लागलं आहे. 

Updated: May 10, 2023, 05:47 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार title=

Maharashtra : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या राजकारणात उद्याचा म्हणजे 11 मे चा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल लागण्याची शक्यता असल्यानं सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांची धाकधूकही वाढलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणाराय... 

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. याप्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्ट उद्या यावर निकाल देण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उद्या दोन घटनापीठाचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामधअये महाराष्ट्रातील राजकीय सत्तसंघर्षाच्या प्रकरणाचाही समावेश असण्याची शक्यता आहे. 

निकालानंतर शक्यता काय?
शक्यता क्रमांक 1 : सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतील. 

शक्यता क्रमांक 2 : आमदारकी गेली तरी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिल का? हा प्रश्न आहे. काहींच्या मते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 6 महिन्यात पुन्हा आमदारपदी निवडून येतील. तर काहींच्या मते पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

शक्यता क्रमांक 3 : आमदारा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांके सोपवला जाईल. तसं झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.

शक्यता क्रमांक 4  : सत्तासंघर्ष प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकजे सोपवलं जाईल.  

शक्यता क्रमांक 5  :  निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करुन पुन्हा कोर्टात दाद मागू शकतं. 

16 आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा
सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उर्वरित आमदारांबाबत कोर्टात काहीच सुनावणी झालेली नाही. त्यामुळं केवळ 16 आमदारच अपात्र ठरतील, असं काही कायदेतज्ज्ञांचं मत आहे. तर ज्या न्यायानं आधीच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल, तोच न्याय इतर 24 जणांनाही लागू होईल. त्यामुळं आधीचे आणि नंतरचे असे शिंदेंसोबतचे सगळेच आमदार अपात्र ठरतील, असंही काही कायदेतज्ज्ञांना वाटतं.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत कोर्टाच्या निर्णयाची शांतपणे वाट बघा, योग्य निर्णय येईल असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय...आम्ही सर्व कायदेशीर केलं असून, निर्णयाबाबत आम्ही आशादायी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार हा नरहरी झिरवळांना आहे, नार्वेकरांनी आधी राजीनामा द्यावा मग बोलावं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय...तर राऊत वारंवार सुप्रीम कोर्टाबद्दल पोटतिडकीने बोलत असून, त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलंय.