Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझानयर विरोधात तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकी आणि कट रचल्याचा आरोपाखाली करत अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या महिलेविरोधात एफआयआर (FIR) दाखल केली होती. या महिलेने आपण डिझायनर असल्याची माहिती दिली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
"अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्याकरता प्रयत्न झाला. आधी पैसे देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. अनिल जयसिंघांनी नावाची व्यक्ती गेली सात आठ वर्षे फरार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. या व्यक्तीची एक मुलगी 2015 ते 2016 दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर भेटणे बंद झाले आणि अचानक या मुलीने माझ्या पत्नीला भेटणे सुरु केले. त्यावेळी तिने मी डिझायनर असल्याचे सांगितले. त्यासोबत तिने माझी आई वारली असून मी तिच्यावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन तुम्ही करा असे माझ्या पत्नीला सांगितले," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही माहिती द्यायचो आणि छापे पडायचे...
"विश्वास संपादित केल्याने त्या मुलीने काही दिवसांनी तिने येणे जाणे चालू केले. ती मुलगी अमृता फडणवीस यांच्याकडे डिझायनर कपडे घेऊन यायला लागली. एक दिवस हळूच तिने सांगितले की माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा. माझ्या पत्नीने याबाबत निवेदन देण्यास सांगितले. सरकार बदलल्यानंतर तिने माझ्या वडिलांना फसवल्याबद्दल सांगितले. काही दिवसांनी तिने सांगितले की माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात. मागच्या काळामध्ये आम्ही माहिती द्यायचो आणि त्यानंतर छापे पडायचे. त्या छाप्यामध्ये आम्हाला दोन्हीबाजूने पैसे मिळायचे. तुम्ही थोडी मदत केली तर आपणही असे छापे मारु शकतो. त्यावेळी माझ्या पत्नीने याकडे लक्ष दिले नाही आणि या गोष्टी माझ्यासोबत बोलू नको असे सांगितले," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कामवालीकडे दिली पैशांची बॅग
"त्यानंतर आपण हा धंदा केला तर फायदा होईल असे पुन्हा त्या मुलीने सांगितले. हे नाही तर माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी देते असेही त्या मुलीने सांगितले. पुन्हा माझ्या पत्नीने याबाबत मला सांगू नको असे सांगितले. पण वारंवार हा विषय यायला लागला तेव्हा माझ्या पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केले. यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडीओ आणि क्लिप आल्या. त्यामध्ये तिने अमृता फडणवीस यांचे संभाषण रेकॉर्ड केले होते. यातल्या एका व्हिडीओमध्ये ही मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरताना दिसत होती. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर धमक्या देण्यात आल्या की हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी धोक्यात येईल. माझे सगळ्या पक्षांसोबत संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा," अशी धमकी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोपी महिलेने घेतली राजकीय नेत्यांची नावे
"हा सर्व समोर आल्यानंतर पोलिसांनी याची माहिती दिली. रितसर तक्रार केल्यावर पोलिसांनी व्हिडीओ फॉरेन्सिकसाठी पाठवले. संबंधित आरोपीला पकडण्याची हालचाली सुरू झाल्या होत्या. गुन्हे दाखल घेण्यासाठी संबधित आरोपीने काही पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांची नावे घेतली होती. मागच्या पोलीस आयुक्तांच्या काळात कारवाई मागे घेण्याचे काम करण्यात आले होते. आरोपीचे अनेक मोठे नेत्यासोबत संवाद झाल्याचे दाखवण्यात आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतील. अडचणीत आणण्यासाठी काय काय करतात हे उघड झालं आहे," असेही फडणवीस म्हणाले.