Thackeray Group iPhone : राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या (BJP-Shiv Sena) सरकारमध्ये फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरण चांगलाच गाजलं होतं. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याकडून विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचे आरोप करण्यात आले. याप्रकरणी रश्मी शुक्ला अडचणीत सापडल्या होत्या. फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने (Thackeray Group) सावध भूमिका घेत पक्षातील नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह त्यांचे पीए यांना फक्त आयफोन (iPhone) वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी चर्चा आहे.
अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सध्याच्या काळात ज्यापद्धतीचं राजकारण सुरु आहे, त्यानुसार आपली सुरक्षा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशी आपण सूचना केल्याचं दानवे यांनी सांगितलं. मात्र पक्षानं अशी कोणतीच सूचना केलेली नाही असं स्पष्टीकरण अंबादास दानवेंनी दिलंय.
इतरांशी बोलताना अनेकदा चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा नंतर गैरवापर करण्यात येतो. म्हणून सर्वांना आयफोन वापरण्याच्या सूचना आपण केल्याचं दानवे यांनी सांगितलं. पण कोणालाही आयफोन वापरण्याची सक्ती केली नाही केवळ सरक्षेसाठी काळजी घ्यावी असं सांगितल्याचं दानवे यांनी सांगितलं.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यास सांगितलं होतं. आतासुद्धा नेत्यांच्या हालचालीवर जाणीवपूर्वणक लक्ष ठेवलं जात आहे, पण घाबरून जाण्याची गरज नाही, शिवसेनेला (ShivSena) जे करायचं आहे ते समोर करते असंही दानवे यांनी सांगितलं. आताचं सरकार कोणत्याही थराला जाऊ शकतं, मोठ्या नेत्यांपासून लहान शिवसैनिकालाही त्रास दिला जात आहे, त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही अशी टीकाही दानवे यांनी केलीय.
शिंदे गटाचा निशाणा
दरम्यान, यावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर निशाणा साधलाय. कदाचित ठाकरे गटाचे कार्यकर्ते श्रीमंत झालेले असू शकतात असा टोला दीपक केसरकरांनी लगावलाय.