बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडलं, आजचा मुक्काम गोव्यात उद्या मुंबईत येणार

8 दिवसांच्या मुक्कामानंतर बंडखोर आमदार आज गुवाहाटीवरुन गोव्याच्या दिशेने रवाना, काय असणार पुढची रणनिती?

Updated: Jun 29, 2022, 05:07 PM IST
बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडलं, आजचा मुक्काम गोव्यात उद्या मुंबईत येणार title=

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. भाजपकडूनही सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दुसरीडे
गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या राज्यात परतणार आहेत. 

एकनाथ शिंदे आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होत आहेत. बहुमत चाचणीसाठी आम्ही विधानसभेत दाखल होणार आहोत. आम्ही बहुमत चाचणीत दाखल होणार आणि कार्यवाही पूर्ण करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत कामाख्य देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उद्या विधानसभेत बहुमत चाचणी होत असल्याचं सांगत आपण उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. 

गेले आठ दिवस गुवाहाटाची हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे असलेल्या एकनाथ शिंदे गटाने आज गुवाहाटी सोडलं आहे. बंडखोर आमदारांचा आजचा मुक्काम गोव्यात असणार आहे. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. हे सगळे बंडखोर आमदार डोनापावलामधल्या हॉटेल ताजमध्ये राहणार आहेत. ताज हॉटेलजवळ जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आलंय. ताज हॉटेलमध्ये 71 रुम्स बुक करण्यात आल्यायत. बंडखोर आमदार स्पेशल विमानानं संध्याकाळपर्यंत गोव्यात पोहोचतील. 

त्यानंतर उद्या सकाळी गोव्यावरुन मुंबईत आणले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दोन तृतीयांशहून अधिक आमदार
दोन तृतीयांशहून अधिक आमदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मुंबईत उद्या दाखल झाल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत, बहुमत चाचणी आम्ही सहज विजयी होऊ अशी गर्जना एकनाथ शिंदे यांनी केलीय.