आधी शिवसेनेत, आता कुटुंबातही फूट, ठाकरे कुटुंबातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 'ठाकरे' कुटुंबच मैदानात

Updated: Oct 6, 2022, 09:04 PM IST
आधी शिवसेनेत, आता कुटुंबातही फूट, ठाकरे कुटुंबातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर title=

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) ठाकरे कुटुंबातील व्यक्ती उपस्थित रहाणार असं बोललं जात होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मेळाव्यात अखेर ती ठाकरे कुटुंबातील व्यक्ती समोर आली. शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावणार ते होते जयदेव बाळासाहेब ठाकरे (Jaydev Thackeray). शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे द्वितीय पुत्र आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सख्खे मोठे बंधू. 

एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून ते व्यासपीठावर बसले होते. केवळ जयदेव ठाकरेच नाहीत, तर स्मिता ठाकरेंची (Smita Thackeray) बीकेसीच्या मंचावरची एण्ट्रीही लक्षवेधी ठरली. स्मिता ठाकरे म्हणजे जयदेव ठाकरे यांच्या घटस्फोटीत पत्नी. बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई. याच व्यासपीठावर आणखी एक ठाकरे शिंदेंची सोबत करताना दिसले, ते म्हणजे निहार बिंदूमाधव ठाकरे (Bindumadhav Thackeray). बाळासाहेबांच्या ज्येष्ठ पुत्राचे चिरंजीव. कधीकाळी 'मातोश्री' परिवाराचा भाग असलेले हे ठाकरेच आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. इतकंच नाही तर जयदेव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ देण्याचं आवाहन सगळ्यांना केलं.

एकनाथ शिंदेंनी आधी शिवसेनेत (Shivsena) बंड घडवून आणलं. 50 आमदार आणि 10 हून अधिक खासदारांना आपल्या बाजूनं वळवलं. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून भाजपच्या (BJP) पाठिंब्यानं शिवसेनेची सत्ता आणली. स्वतः मुख्यमंत्रीपद पटकावलं. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दावा ठोकत, धनुष्य बाण निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरू केला आहे.  

उद्धव ठाकरेंना आव्हान देत बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा यशस्वी करून दाखवला. याच मेळाव्यात त्यांनी मोठा मास्टर स्ट्रोक लगावला. तो ठाकरे कुटुंबातील तीन बड्या व्यक्तींना व्यासपीठावर आणून. शिवसेनाप्रमुखांची सावली असलेले चंपासिंह थापा (Champa Sing Thapa) शिंदेंच्या छावणीत दाखल झालेत. पण ठाकरे कुटुंबातील व्यक्तींना आपल्यासोबत आणून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोर का झटका...अगदी जोर से दिलाय.