Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच मॉरिसने आत्महत्या केल्याचे फुटेज आहे का? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
"गोळ्या झाडताना दिसत आहे पण कोणी झाडल्या ते दिसत नाही. मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हते. त्याने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का हा प्रश्न आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. कारण आधीचे राज्यपाल कर्तव्यदक्ष होते आणि त्यांच्यासोबत गुंडांचा फोटो होता," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं, तेवढं सोप नाही. ज्या गुडांने हत्या केली, त्याने आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले, त्यामध्ये गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. पण त्या कुणी झाडल्या? हे दिसत नाही. या गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की दुसऱ्या कुणी झाडल्या हा प्रश्न निर्माण होतो. मॉरिसने आत्महत्या केल्याचे फुटेज आहे का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केली.
राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला - उद्धव ठाकरे
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय. या महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा प्रश्न मला पडला आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलवता - उद्धव ठाकरे
"श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका. पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.