Raut Shared Photo of CM Eknath Shinde: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवर गुंडांशी संबंध असल्याचे आरोप करत आहेत. केवळ आरोप न करता राऊत मुख्यमंत्री शिंदेंनी या गुंडांची भेट घेतल्याचा दावा करत फोटोही पोस्ट करत आहेत. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मॉरिस भाईचा शिंदेंबरोबरचा फोटोही राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर आज राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंबरोबर सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर करत थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवर फोटो शेअर केलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोटो काढताना दिसत आहे. फोटोमध्ये सेल्फीसाठी मुख्यमंत्री स्माइल देत असल्याचंही पाहाया मिळत आहे. "गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य!" अशी कॅप्शन देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये पुढे संजय राऊत यांनी ही व्यक्ती कोण आहे याची माहिती दिली आहे. "नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यावरुन केलेल्या प्रतिक्रियेवरुन खोचक टोला लगावला आहे. 'श्वानाचे पिल्लू चाकाखाली मेले म्हणून विरोधक राजीनामा मागणार काय?' असा सवाल फडणवीसांनी विचारला होता. याचाचसंदर्भ देत राऊत यांनी, "हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच," असं म्हटलं आहे. राऊत यांनी फडणवीसांना थेट आव्हानही दिलं आहे. "हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा," असं राऊत म्हणाले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र जी
यालाच म्हणतात गुंडांनी
गुंडा साठी चालविलेले राज्य!
नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे.
तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत!
हे असे असल्यावर दोन पायांची
कुत्र्याची पिल्ले… pic.twitter.com/C9Cl0Jg8Wk— Sanjay Raut (@rautsanjay61) February 10, 2024
'सामना'च्या अग्रलेखामधूनही आज फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. ‘‘गाडीखाली येऊन कुत्र्याचे पिल्लू मेले म्हणून विरोधक राजीनामा मागणार काय?’’ या निर्लज्ज वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. महाराष्ट्रात गुंडगिरीस बळी पडलेल्या जनतेस ते कुत्र्याची उपमा देत आहेत. हिंदू धर्मात, मानवधर्मात कुत्र्यासही म्हणजे प्राणिमात्रासही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. तोच खरा हिंदू धर्म आहे, पण फडणवीस त्यांचे गुरू मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून हवे तसे बोलत आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
"राजकारणी गुंडांना आश्रय देतात असेच आतापर्यंत सांगितले जात होते, पण महाराष्ट्रात राजकारण आणि सत्ता गुंड-माफियांच्या हाती गेल्याचे दिसत आहे. रोज घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लागलाच होता, पण अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली त्यामुळे महाराष्ट्रालाच हादरा बसला. शिवसेनेचे उपनेते व कडवट निष्ठावान शिवसैनिक विनोद घोसाळकर यांचे अभिषेक हे चिरंजीव. स्वतः अभिषेक शिवसेनेचे नगरसेवक होते. मुंबई बँकेचे संचालक होते. शिवसेनेच्या संकटकाळात ते पिता-पुत्र एका निष्ठsने खंबीरपणे उभे राहिले. अशा लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कॅबिनेट बैठकांपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी लावतात," अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.