नवी दिल्ली : महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते, अशी चर्चा आहे. तर १२ ते १५ मे दरम्यान मतमोजणीची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा आहे. लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक घ्यायची की नाही यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाची बैठक दिल्लीत सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयुक्तांनी देशातील राज्यांचा दौरा केला होता. त्यांनी तेथील निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर करण्याबाबत विचारविनिमय होत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका या ठरल्या तारखेला आणि वेळेनुसार होतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करु शकतो, असे बोलले जात आहे.