मुंबई : महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न अमरावती पासून एसटी संपापर्यत होत आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
एसटीचा विषय गंभीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात वाय बी चव्हाण सेंटर इथं बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी बैठकीबाबतची माहिती दिली. एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत त्यांनी परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वाना सहानुभूती आहे. आज शरद पवार यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
परमबीर सिंग यांचा विषय मोठा नाही
शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी इतका मोठा विषय नाही, परमबीर सिंग समोर येऊन बोलत असतील तर ते ऐकून घेण्यात येईल. ते आता आरोपी आहेत आणि ज्याच्यावर आरोप आहेत तो असं बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्र हे सर्वाधिक सुरक्षित राज्य आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांना टोला
नव्या वर्षात राज्यातील सरकार जाईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी 28 वेळा हे विधान केलं आहे. ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही, आज पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे पूर्ण झालीयत. त्यामुळं चंद्रक्रांतदादा असं बोलत असावेत. त्यांनी झोपेतून जाग व्हायला हवं असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.