मुंबई : बंगालच्या उपसागरातील पेथई चक्रीवादळ सोमवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
सोमवारी पुण्यातील किमान तापमान ८.३ सेल्सियस नोंदविण्यात आले होते. हे यावर्षीचे सर्वात निचांकी तापमान होते. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर याच तापमानात वाढ होऊन मंगळवारी पारा ११.२ सेल्सियसवर स्थिरावला. मात्र सध्या असलेले हवामान थंडीसाठी पोषक आहे.
पुढील काही दिवसांत तापमान ६ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली उतरण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीत वाढ होऊन हुडहुडी जाणवेल. दरम्यान पेथई चक्रीवादळामुळेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र, यापुढे मात्र पावसाची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेचे डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले.