मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याने लावण्यात आलेले कडक निर्बंध 5 टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहिला मिळतोय. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं आढळून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं नवे आदेश काढले आहेत.
राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली तरी यापुढं राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. नव्या आदेशामुळं सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर असलेले जिल्हे थेट तिसऱ्या स्तरावर आले आहेत. त्यामुळं त्यांना नव्यानं निर्बंधांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती.