मुंबई : झी २४ तासनं उजेडात आणलेल्या शिवभोजन थाळी घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. कार्यकर्त्यांच्या सोईसाठी ही योजना असल्याचा आरोप करत शिवाजी महाराजांचं नाव आहे तिथं भ्रष्टाचार या सरकारला चालतो का असा सवालही फडणवीसांनी केला आहे.
शिवथाळी हा जो काही उपक्रम आहे, हा केवळ सत्ता पक्षाच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यांचा व्यावसाय चालवण्याकरता तयार करुन दिलेली व्यवस्था आहे. शिवथाळीच्या नावावर एक फार मोठा घोटाळा सुरु आहे. शिवथाळी महाराजांच्या नावाने चालवता आणि त्यामध्ये असा घोटाळा करता, शिवाजी महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार होता. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना.
महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार.
हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 21, 2021
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्ताकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळी योजनेतील भ्रष्टाचार झी २४ तासने उघड केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
योजनेतील अनुदान दलालांनी लाटलं
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटलीये, यातून सरकारनं आपल्या बगलबच्चांची सोय केलीय आणि लहानग्यांना उपाशी ठेवण्याचं पाप केलंय, गरीबांच्या हक्काचं भोजन दलालांच्या घशात कसं गेलं, याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
ग्राहकांचा फोटो एकच पण नावे वेगवेगळी टाकून शिवभोजन थाळी योजनेतील अनुदान दलालांनी लाटलीये
यातून सरकारनं आपल्या बगलबच्चांची सोय केलीय आणि लहानग्यांना उपाशी ठेवण्याचं पाप केलंय
गरीबांच्या हक्काचं भोजन दलालांच्या घशात कसं गेलं,याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी pic.twitter.com/Wmf6kX3oSD
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 21, 2021
भ्रष्टाचाऱ्याच्या चौकशीची मागणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवथाळी योजना चांगली आहे, पण अनेक बोगस प्रकार सुरू असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांचं अजब उत्तर
शिवभोजन थाळी योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी अजब उत्तर दिलं आहे. एखाद्या केंद्रात काही सापडलं, तर फार मोठा घोटाळा झालाय, असं नाही, असं सांगत या प्रकरणाची तीव्रता कमी करण्याची खटपट ते करत नाहीयेत ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवभोजन योजनेतला भ्रष्टाचार
राज्यातल्या गोर-गरिब, गरजूंना सवलतीच्या दरात जेवण मिळावं म्हणून राज्य सरकारनं शिवभोजन थाळीची महत्वाकांक्षी योजना आणली. मात्र प्रत्यक्षात या योजनेच्या नावावर शिवभोजन थाळीचा काळाबाजार सुरू आहे. गरिबांच्या थाळीवर डल्ला मारला जात आहे.
10 रूपयांत शिवभोजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो असलेले बॅनर सर्वच शिवभोजन केंद्रावर पाहायला मिळतात. मानखुर्दमधल्या अशाच एका शिवभोजन केंद्रावर झी 24 तासची एसआयटी टीम पोहचली. केंद्रावर गर्दी असेल, गोर-गरिबांना 10 रूपयात भरपेट जेवण मिळत असेल असं वाटलं होतं.
पण इथं तर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. शिवभोजन थाळीच्या नावावर चक्क लहान मुलांची दोन घोट ज्यूसवर बोळवण केली जात होती. रस्त्यावरच्या लोकांना बोलावून बॅनरसमोर त्यांचे फोटो काढले जात होते.
थाळी माफियांच्या गोरखधंद्याचा तपास करण्यासाठी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांचा आधार घेतला. त्यातलं चित्र आणखीनच वेगळं होतं. एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या नावानं फोटो अपलोड करण्यात करण्यात आले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थी ही लहान मुलंच दाखवण्यात आली आहेत.