गुढीपाडव्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार

भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?

Updated: Jan 5, 2020, 08:01 PM IST
गुढीपाडव्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार title=

मुंबई: येत्या गुढीपाडव्यापर्यंत राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पडेल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते रविवारी 'झी २४ तास'शी बोलत होते. यावेळी त्यांना बऱ्याच विलंबानंतर पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या खातेवाटपाविषयी विचारणा करण्यात आली. यावर मुनगंटीवार यांनी म्हटले की, २०१९ मध्ये सरकार आलं, २०२० मध्ये खातेवाटप झाले आणि आता मराठी नववर्षानंतर या सरकारला 'जय हिंद, जय महाराष्ट्र' करावे लागेल. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारमधील नाराजी, तक्रारी, राजीनामास्त्र या घटनाक्रमावर बोट ठेवले. घटनांची ही मालिका पाहता सरकार लवकरच पडेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

यासाठी भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर मुनगंटीवार यांनी म्हटले की, आम्हाला ऑपरेशन लोटस करण्याची गरज नाही. ज्या सत्तेचा आधार बेईमानी आणि जनादेशाचा अनादर आहे, ती कोसळणे क्रमप्राप्त असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले. 

यावेळी मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडीतील खातेवाटप घोळावरही भाष्य केले. महाविकासआघाडीतील पक्षांनी आपापल्या नेत्यांना खातेवाटपावेळी धक्के दिले. हे नेते भविष्यात व्याजासकट हे धक्के परत करतील, असे भाकीतही यावेळी मुनगंटीवार यांनी वर्तविले. 

३० डिसेंबरला महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला होता. मात्र, यानंतर खातेवाटप होण्यास तब्बल सहा दिवसांचा अवधी लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असलेल्या चुरशीमुळे या खातेवाटपाला विलंब झाल्याचे सांगितले जाते. मात्र, यानंतरही तिन्ही पक्षातील अनेक मंत्री नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारची आगामी पाच वर्षातील वाटचाल जिकिरीची मानली जात आहे.