मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना एकमेकांची गरज

पक्षाच्या स्थापनेपासून मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त १४ नगरसेवक निवडून आले आहेत.

Updated: Mar 1, 2020, 04:53 PM IST
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना एकमेकांची गरज title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सध्या राष्ट्रवादीचे मुंबई  महापालिकेत आठ नगरसेवक आहेत, हा आकडा पुढच्या निवडणुकीपर्यंत ५० ते ६० च्या वर नेण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेवले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. आज मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तयारीससाठी राष्ट्रवादीचे 
मिशन २०२२ पार पडले.

ग्रामीण भागात बऱ्यापैकी ताकद आणि जनाधार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत आपला  विस्तार कधीच करता आला नाही. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून ते २०१४ अशी सलग पंधरा वर्ष पक्ष सत्तेत होता. पण काही केल्या राष्ट्रवादीला मुंबईने कधीच साथ दिली नाही.

पक्षाच्या स्थापनेपासून मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापुढे  हा आकडा गेलेला नाही. मागील म्हणजेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आठच नगरसेवक निवडून आले. आता हा आकडा ५० ते ६० पर्यंत नेण्याचं उद्दीष्ट्य राष्ट्रवादीनं ठेवलंय. त्याची तयारी मिशन २०२२ च्या  द्वारे आतापासूनच सुरू केली आहे.

मात्र, पक्षाचे मुंबईत नगरसेवक वाढवायचे असतील तर राष्ट्रवादीला एकट्याच्या बळावर ते शक्य नाही. यापूर्वीच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकी राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी करून लढवल्या. आता मात्र आपली मुंबईतील ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेचीही साथ घेणार आहे. आगामी महापालिका निवडणुकी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीनही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत.

२०१७च्या निवडणुकीत शिवसेना ८४ तर भाजपाने ८२ जागा लढवल्या होत्या. भाजपाने या निवडणुकीत मोठी झेप घेत शिवसेनेशी जवळपास बरोबरी साधली होती. आता २०२२ ची निवडणूक शिवसेना एकट्याने  लढली तर भाजपाला टक्कर देऊ शकेल का, याची शाश्वती पक्षाच्या नेत्यांना नाही. 

त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवून मुंबईत भाजपाची ताकद कमी  करायची अशी  रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. एकीकडे मुंबईत ताकद नसलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जशी आपली ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. भाजपाला शह  देण्यासाठी शिवसेनेलाही या दोन पक्षांची गरज आहे. त्यामुळे यावेळची मुंबई  महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार असून राष्ट्रवादीने दोन वर्ष आधीच त्याच रणशिंग फुंकले आहे.