दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात एकत्रित सत्ता मिळवलेल्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष विविध निवडणुकींमध्ये एकत्र येताना दिसताय. जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकीबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. याची सुरुवात आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीपासून होते आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. २०१४ पूर्वी या बाजार समितीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजर समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता. मागील सहा वर्ष या समितीवर प्रशासक होता. आता सत्ता बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्र लढवण्याचं ठरवलंय. तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवलंय. त्यामुळे महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर २५ संचालक निवडून येतात. या २५ पैकी १८ संचालकपदासाठी निवडणूक होते, तर ७ संचालक शासन नियुक्त असतात. या निवडणुकीत १८० उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तीन पक्ष एकत्र येताना दिसतायत. त्यामुळेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जराही रस न घेणाऱ्या शिवसेनेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे.