मुंबई : रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं. यानंतर आता या चक्रीवादळने मुंबई ठाण्याच्या दिशेने कूच केले आहे. तीन तास ही प्रक्रिया चालू राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. शिवाय मुंबई आणि उपनगरांमध्ये सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग हा वाढताच आहे. त्यामुळे नगरिकांना घरा बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितले जात आहे.
.@mybmcWardGN ने माहीम कॉजवेच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना जवळील महापालिका शाळांमध्ये स्थलांतरित केले आहे.
.@mybmcWardGN has shifted residents of vulnerable settlements along Mahim Causeway to nearest Municipal Schools.
#NisargaUpdates pic.twitter.com/S7rl7RZ5cJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 3, 2020
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून माहीम कॉजवेच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना जवळील महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. अशी माहिती खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. या चक्रीवादळाचे परिणाम मुंबई किनारपट्टीलगतही दिसून येणार आहेत. ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईच्या बुहतांश भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्याच्या धर्तीवर मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.