निसर्ग चक्रीवादळानंतर काय आहे मुंबई, कोकणातील स्थिती?

रायगडात वादळानंतर जोरदार वारा आणि पाऊस

Updated: Jun 3, 2020, 04:01 PM IST
निसर्ग चक्रीवादळानंतर काय आहे मुंबई, कोकणातील स्थिती?

ब्युरो रिपोर्ट :   निसर्ग चक्रीवादळ समुद्र किनाऱ्यावर धडकलं. पण चक्रीवादळ धडकण्याआधीच कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले  आणि समुद्राला उधाण आलं. चक्रीवादळ धडकल्यानंतरही जोरदार वारा आणि पाऊस कायम राहिला. रायगड आणि रत्नागिरीत समुद्राला उधाण आलं. दरम्यान, चक्रीवादळ दक्षिणेकडे सरकल्याने मुंबईवरचा मोठा धोका मात्र टळला.

मुंबईसह कोकणात मोठ्या वादळी वाऱ्यांनी अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कोकणात अनेक ठिकाणी घरांची छप्पर आणि पत्रेही उडाले. मुंबईतही काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत पश्निम उपनगरातही वारा आणि पाऊस सुरु झाला होता. 

निसर्ग वादळाचा सर्वात जास्त तडाखा रायगडच्या किनाऱ्यावर बसत आहे. अलिबागपासून दक्षिण किनाऱ्यावर श्रीवर्धन दिवेआगार येथे वादळ धडकले. रायगडच्या किनाऱ्यावर यावेळी जोरदार वादळाने दणका दिला. वादळ आल्यानंतर रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊसही सुरु झाला. जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे रायगडात अक्षरशः संचारबंदीचं वातावरण होतं. अर्थात प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहनही केले होते. तसेच हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार वारे वाहत होते. अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे, छप्पर उडाले. झाडंही पडली. रत्नागिरी जिल्ह्यातही किनारपट्टीभागात जोरदार पाऊस बरसला.

सिंधुदुर्गातही जोरदार वारे वाहत होते. किनारपट्टी भागात पाऊस आणि जोरदार वारे वाहत होते.

पालघर जिल्ह्यात मात्र निसर्ग चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. समुद्रही शांत होता आणि पावसानेही पाठ फिरवली होती. मात्र पालघर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पुढचे काही तास वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

 

नाशिक विभागातील काही जिल्ह्यातही पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.